Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
धार्मिक स्थळे

Balleshwar

बल्लाळेश्वर गणेश  (पाली) :

जे भक्त अष्टविनायक यात्रा करायला जातात त्यांना दोन मार्गांनी येथे पोहोचता. येथे पहिला मार्ग रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील महड येथून आहे आणि दुसरा मार्ग सुधागड तालुक्यातील पाली येथून आहे. खंडाळ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या खोपोली येथून हे ठिकाण जवळ आहे.

अष्टविनायकातील आठ गणपतींपैकी पालीचा बल्लाळेश्वर हा तिसरा गणपती आहे. मंदिरासमोर दोन तलाव आहेत. देवळाच्या गाभाऱ्यात गणेशाची तीन फूट उंचीची मूर्ती आहे. तेथे एक पंचधातूंनी घडविलेली मोठी घंटादेखील आहे. अशीच एक घंटा भीमाशंकर येथेही पाहायला मिळते. मंदिराशेजारीच सरसगड आहे. किल्लेप्रेमी यावर दोन मार्गांनी जाऊ शकतात. पहिला मार्ग रामाळी, देऊळवाडीच्या उत्तेरेकडून आणि दुसरा मार्ग दक्षिणेकडून जातो. उत्तरेकडच्या मार्गावर पायऱ्या बांधलेल्या आहेत. अर्ध्या किलोमीटरवरून किल्याच्या प्रवेशद्वाराचे बुरुज दिसतात. किल्यात तलाव आहे, त्यात बारमाही पाणी असते. किल्यात वर जाण्यासाठीचा दक्षिणेकडील मार्ग अधिक प्रसिद्ध आहे. तेथे दगडात ९६ पायऱ्या कोरण्यात आल्या आहेत. पायऱ्यांची संख्या कमी असली तरीही प्रत्येक पायरी दीड ते दोन फूट उंच असून चढण्यासाठी फारच कठीण आहेत. १३०० फूट उंच असलेल्या या किल्या वरून अंबा नदी, सुधागड, कर्नाळा, माणिकगड, बदृतीन किल्ला हे कोकणातील किल्ले आणि कोरीगड, घणगड, तेलबैल्या, नागफणी हे घाट विभागातील किल्ले दिसतात. येथील गरम पाण्याची कुंडेही पर्यटकांना पाहता येतात.


Suvarna Ganesh Diveagar

सुवर्ण गणेश  दिवेआगर :

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर गावात सुवर्ण गणेशाचे मंदिर आहे. समुद्र किनारी असलेले हे मंदिर नारळ-पोफळीच्या झाडांमध्ये लपलेले आहे. अरबांच्या् आक्रमणापासून वाचविण्यासाठी सुवर्ण गणेशाला जमिनीत पुरून ठेवण्यात आले होते. नंतर १९९७ साली या मूर्ती पुन्हा सापडल्या. ही गणेशमूर्ती शिलाहार काळातील शैलीतील आहे, त्यावर सुंदर कोरीवकाम करण्यात आले आहे.


Shri Varadvinayak Ashtavinayak

श्रीवरदविनायक  महड:

महाराष्ट्रा्च्या कोकण विभागातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात महड हे एक सुंदर गाव आहे. येथील वरदविनायक गणपती भक्तांच्याा सर्व इच्छा पूर्ण करणारा आणि त्यांना वरदान देणारा आहे. या भागाला प्राचीन काळी भद्रक किंवा मधक असे म्हटले जायचे. वरदविनायकाची मूळ मूर्ती गाभाऱ्याबाहेरूनच दिसते. दोन कोपऱ्यांत दोन गणेश मूर्ती आहेत. डावीकडची मूर्ती डाव्या सोंडेची आणि उजवीकडील पांढऱ्या दगडात घडविलेली उजव्या सोंडेची आहे. गाभारा दगडाचा बनविण्यात आला आहे आणि त्यात हत्तीचे आकार कोरण्यात आले आहेत. गाभाऱ्यात रिद्धी आणि सिद्धीच्या दोन मूर्तीही पाहायला मिळतात.


siddhivinayak temple

सिद्धिविनायक नांदगाव,  मुरुड जंजिरा :

मुरुडपासून १० किमी अंतरावर काशीद आणि मुरुडच्यामध्ये नांदगाव येथे सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. माघी चतुर्थीचा उत्सव येथे दरवर्षी मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. तसेच दरमहिन्याच्या संकष्टी चतुर्थीलाही येथे दर्शन करण्याला पारंपारीक महत्व् प्राप्त झाले आहे. हे मंदिर नांदगाव समुद्र किनाऱ्याजवळ आहे. या मंदिरात दर्शनासाठी आलेले असतानाच मुरुड जंजिऱ्यालाही भेट देता येते. मुरुड-जंजिरा हे पर्यटकांसाठी आकर्षक ठिकाण आहे.